नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील फुलेनगरमध्ये जुन्या वादातून दोघा भावांवर धारदार हत्याराने केल्याने यात एकाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सातही आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची व प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
जयराम नामदेव गायकवाड (रा. लक्ष्मणनगर, तेलंगवाडी, पेठरोड, पंचवटी), दशरथ नामदेव गायकवाड, श्रीराम नामदेव गायकवाड, सुरज जयराम गायकवाड, अंबिका अर्जून पवार (सर्व रा. वैशालीनगर, पेठरोड), संदीप चंद्रकांत पवार (रा. अश्वमेघनगर, पवार चाळ, पेठरोड), राहुल चंद्रकांत पवार (रा. देवळाली गाव, नाशिकरोड) अशी आरोपींची नावे आहेत.
फुलेनगरमध्ये १३ जून २०१८ रोजी रात्री ९च्या सुमारास फिर्यादी सुनील सुखलाल गुंजाळ (रा. वैशालीनगर) त्याचा भाऊ अनिल गुंजाळ, सागर माने, दीपक गोराडे हे गप्पा मारत होते. त्यावेळी जुन्या वादाची कुरापत काढत आरोपी त्याठिकाणी आले असता, त्यांनी धारदार हत्यारांनी चौघांवर हल्ला चढविला. यात अनिल गुंजाळ याच्यावर सपासप वार करीत गंभीर जखमी केले. यात अनिल हे जागीच मयत झाले. तर सागर माने, दीपक गोराडे हे गंभीररित्या जखमी झाले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल होता.
दरम्यान आरोपी जयराम नामदेव गायकवाड, दशरथ नामदेव गायकवाड, श्रीराम नामदेव गायकवाड, सुरज जयराम गायकवाड, अंबिका अर्जून पवार, संदीप चंद्रकांत पवार, राहुल चंद्रकांत पवार यांना जन्मठेप तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी केला असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सदरचा खटला जिल्हा सत्र न्यायालय जे.एम. दळवी यांच्यासमोर चालला. तर, सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. एस.एम. गोरवाडकर, डॉ. सुधीर कोतवाल यांनी कामकाज पाहिले. त्यानुसार सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार मधुकर पिंगले, एस.टी बहिरम यांनी पाठपुरावा केला.