नाशिक (प्रतिनिधी): गव्हर्नरपद मिळवून देण्याचे आमिष दाखवत नाशिकच्या बारावी पास भामट्याने चक्क तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाला ५ कोटींना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी (वय: ४०, रा. गंधर्व नगरी, नाशिकरोड) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दहा दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि नरसिम्मा रेड्डी अपुरी (रा. चेन्नई, तामिळनाडू) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारीपासून आतापर्यंत मुंबई नाका येथील तारांकित हॉटेलमध्ये संशयित निरंजन कुलकर्णी याच्यासोबत रेड्डींची भेट झाली. संशयिताने माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत ओळख असून राज्यपाल पद मिळवून देण्यासाठी कमिशन म्हणून १५ कोटीचा प्रस्ताव दिला.
चर्चेनंतर रेड्डी यांना विश्वास बसल्याने त्यांनी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ५ कोटी ८ लाख ९९ हजार रुपये संशयिताला दिले. रक्कम घेताना संशयिताने जमिनीचे बोगस दस्तावेज दिले. रेड्डी यांनी कागदपत्रांची चौकशी केल्यानंतर ते खोटे असल्याचे समजले. त्यानंतर संशयिताशी फोनवर संपर्क केला असता त्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताला अटक केली. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३६६/२०२४)
शासनाने १०० एकर जमीन दिल्याचे दाखवत भुलवले:
फेब्रुवारीत रेड्डींची नाशिकमध्ये संशयितासोबत पहिली भेट झाली. संशयिताने विश्वास संपादन करण्यासाठी काम झाले नाही तर माझ्या नावे असलेल्या जमिनीचे खरेदीखत तुमच्या नावे करुन देईल असे सांगून पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्पाजवळील १०० एकर जमीन शासनाकडून भाडेतत्वावर घेतल्याबाबतचे शासनाचे शिक्के असलेले बनावट दस्तावेज दाखवले. चांदशी येथील नावावर असलेल्या शेत जमिनीचा बनावट सातबाराही दाखवला. रेड्डी याला भुलल्याने ते संशयिताच्या जाळ्यात सापडले.
मंत्र्यांसोबतचे फोटो दाखवत केला विश्वास संपादन:
त्र्यंबकेश्वर येथील एक मित्राच्या माध्यमातून संशयिताची रेड्डी यांच्याशी ओळख झाली. संशयिताने राजकीय नेते, आजी-माजी मंत्री यांच्यासोबत असलेले फोटो दाखवत रेड्डींचा विश्वास संपादित करत गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
![]()


