नाशिक (प्रतिनिधी): द्वारका येथील धर्मदाय उपआयुक्त व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील दोन लाचखोर लिपिकांना मंगळवारी (दि.१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजारांची लाच घेताना जाळ्यात घेतले. संशयित सुमंत सुरेश पुराणिक (४०, रा. डीजीपीनगर-१), लघुलेखक संदीप मधुकर बावीस्कर (४७, सिडको) अशी लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदारांकडे नवीन दाखल फाइलच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणूक न करणे, निकाली फाइल नकला विभागाला वेळेत पाठविणे, पुढील सुनावणीच्या कामकाजात अडथळा न आणता जलद गतीने काम मार्गी लावण्याच्या मोबदल्यात पुराणिक याने तक्रारदाराकडे २३ सप्टेंबर रोजी २० हजार रुपयांच्या लाच मागितली होती. तडजोडअंती १५ हजार लाच देण्याचे ठरले. यासाठी लघुलेखक बावीस्कर याने लाच घेण्यास प्रोत्साहन दिले होते.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने खात्री पटवून सापळा रचला. पंच व साक्षीदारांच्या समक्ष लाचखोरांनी १० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस नाईक विनोद चौधरी, अनिल गांगोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.