नाशिक (प्रतिनिधी): जत्रा हॉटेलकडून नाशिकरोडकडे दुचाकीने जात असताना संभाजीनगर रोडवर दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आले असता झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला असून, याप्रकरणी स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन बन्सीलाल ताडगे (३६, रा. जेऊर वखारी, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नितीन हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच ४१ बीपी ९६५८) नाशिकरोडकडे जात होते. त्यावेळी संभाजीनगर रोडवरील समृदधी लॉन्ससमोर असताना त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आले. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.
या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि मेंदूला इजा पोहोचली होती. त्यामुळे त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले होते.