नाशिक (प्रतिनिधी): गांधीनगरमध्ये मित्राला भेटून दुचाकीवरून नाशिक-पुणे महामार्गावर वळण घेत द्वारकाच्या दिशेने जाणाऱ्या जेलरोड पंचक येथील दुचाकी चालकाला ट्रकचालकाने धडक दिल्याने युवक ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक अर्धा ते एक तास खोळंबली होती.
जेलरोड, पंचक, अयोध्यानगर येथील मोहन दर्शन अपार्टमेंट राहणारा सागर यशवंत हिरे (३१) हा युवक शुक्रवारी दुपारी गांधीनगर येथे मित्राला भेटण्यासाठी गेला होता. मित्राला भेटून सागर हा आपल्या दुचाकीवरून (एमएच १५ केबी ७७३८) गांधीनगर गेटमधून बाहेर पडून द्वारकेच्या दिशेने वळत होता.
त्याच वेळी नाशिकरोडकडून द्वारकेकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच१२ एचडी ०९९१) दुचाकीला धडक दिल्याने सागर हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १३०/२०२५)