नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भरधाव पिकअपचालकाने मारुती कारला दिलेल्या धडकेत एक पोलीस शिपाई जागीच ठार एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना मखमलाबाद शिवारात घडली.
रमेश पांडुरंग अवतार असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, प्रवीण मनोहर दोबाडे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस हवालदार राजेश काकड यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास मातोरी रोडवरील जय मल्हार हॉटेलसमोरून ग्रामीण पोलीस दलातील शिपाई रमेश पांडुरंग अवतार व प्रवीण मनोहर दोबाडे हे दोघे जण एमएच ०४ बीवाय ११८३ या क्रमांकाच्या मारुती कारने जात होते.
त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या एमएच १५ एचएच ४८३० या क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनावरील चालकाने मारुती कारला समोरून धडक दिली. त्यात रमेश अवतार यांचा मृत्यू झाला, तर प्रवीण दोबाडे यांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर पिकअपचालक अपघाताची खबर न देता पळून गेला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पिकअपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत.