नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पुण्यातील मद्यपी अल्पवयीन चालकाने भरधाव वेगात कार चालवून दोघांचा बळी घेतल्याची घटना राज्यभर गाजत असताना, नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजी चौकात मद्यपी चालकाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्यालगतची संरक्षण भिंत तोडून रो-हाऊसमध्ये घुसल्याची घटना घडली.
या अपघातामध्ये रो-हाऊसबाहेरील पोर्चमध्ये झोपलेल्या ६ वर्षीय चिमुरड्यासह दाम्पत्य जखमी झाले आहेत. याप्रकरणी मद्यपी कारचालकाविरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जगदीश खरमाडे असे मद्यपी कारचालकाचे नाव आहे. तर, या अपघातामध्ये सुरेश कृष्णा भदाणे (६०), कलाबाई सुरेश भदाणे (५८), पृथ्वी सूरज सूर्यवंशी (६, सर्व रा. रेशमाई रो हाऊस, कालिका मंदिराजवळ, शिवाजी महाराज चौक, शिवाजीनगर) हे जखमी झालेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा अपघात मंगळवारी (ता. ४) पहाटे एक वाजेच्या सुमारास झाला आहे. शिवाजीनगर येथील शिवाजी चौकात असलेल्या उतारावरून संशयित मद्यपी चालक खरमाडे हा भरधाव वेगात नेक्सन इव्ही कार (एमएच १५ जेएस १७४१) चालवत असता, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याची कार थेट रस्त्यालगत असलेल्या रेशमाई रो हाऊसची संरक्षण भिंती तोडून आत रो-हाऊसच्या पोर्चमध्ये शिरली.
रो हाऊसच्या पोर्चमध्ये भदाणे दाम्पत्य व लहान मुलगा हे झोपलेले होते. भरधाव वेगातील कारने रो हाऊसच्या संरक्षण भिंतीला धडक दिली. त्यामुळे भिंत पडून विटा झोपलेल्या भदाणेंच्या अंगावर पडल्याने ते गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी संशयित कारचालक खरमाडे यास ताब्यात घेतले असता तो मद्याच्या नशेत असल्याचे समोर असून, अपघातात तोही जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी संशयित कारचालकास ताब्यात घेत त्यांची वैदयकीय चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास अंमलदार जयवंत बागुल हे करीत आहेत. (गंगापूर पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: १३५/२०२४)