नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाट्यावर गुरुवारी (दि. २६) सकाळी ७.३० वाजता अंबड लिंकरोडवरील सिडकोतून पाथर्डी फाट्याकडे तर फाट्याकडून अंबड एमआयडीसीकडे जाणाऱ्या त्रिफुलीवर भरधाव आयशरने कंपनीत कामाला जाणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक देत त्याचा बळी घेतला.
ट्रकचालक फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात हिट अॅण्ड रनचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र सर्व रस्ते एमआयडीसीकडे जाणारे असूनही चौफुल्यांवर वाहतूक पोलिस दिसत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
अरुण सुरेश राजगुरू (४४, रा. प्लॉट नंबर १७ पाण्याच्या टाकी जवळ स्वामी विवेकानंद नगर, मखमलाबाद नाशिक) हे नेहमीप्रमाणे अंबडच्या कंपनीत सकाळी जात होते. पाथर्डी फाटा येथील जनता स्वीट चौकात रस्ता ओलांडताना मागून भरधाव आलेल्या मालवाहू आयशरने (एमएच १५ जीव्ही ५५४२) धडक दिली. त्यात राजगुरू हे खाली पडत ६० मीटरपर्यंत फरपटत गेले आणि ट्रकच्या मागील चाकाखाली दाबले गेले. त्यांचे हेल्मेटही फुटले, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल असूनही येथे पोलिस दिसत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या घटनेनंतर चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.