नाशिक (प्रतिनिधी): मागील काही दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरासह उपनगरांमधील रस्त्यांची ठिकठिकाणी चाळण झाली आहे. एका निसरड्या रस्त्यावर आडगाव मेडिकल कॉलेजसमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिला ठार झाल्याची घटना घडली. योगिता दिलीप कडाळे (वय ४७, रा. गिरणारे) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचून चिखल पसरून सर्वच भागातील रस्ते निसरडे बनले आहेत. बुधवारी (दि.२१) सकाळी सात वाजेच्या सुमारास दिलीप कडाळे यांच्यासोबत दुचाकीने योगिता कडाळे या नागलवाडीकडून कसबे सुकेणेच्या दिशेने प्रवास करत होत्या. आडगाव मेडिकल कॉलेज समोरील निसरड्या रस्त्यावरून अचानकपणे दुचाकी घसरल्याने कडाळे दाम्पत्य खाली पडले. योगिता कडाळे यांच्या डोक्याला मार लागल्याने तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (आडगाव पोलीस स्टेशन, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक: १२३/२०२४)
अपघात वाढले; गाडी चालवताना ही घ्या काळजी:
शहरात पावसाने जवळपास सर्वच रस्ते निसरडे झाले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाल्याने वाहन चालविताना पाण्याने भरलेला खड्डा लक्षात येत नाही. या दोन कारणांनी अपघात वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी दुचाकी हळुवार चालवावी, रस्त्यावरील पाण्याने भरलेल्या खड्याचा अंदाज घेऊन वाहन तेथून हाकावे. डोक्यात हेल्मेट घालूनच प्रवास करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790