नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक – पुणे महामार्गावरील पळसे येथे भरधाव वेगातील अज्ञाक वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शहरात भरधाव वेगात वाहने चालवून पादचाऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न केला जात असून पोलिसांकडून अशा बेदरकार वाहनचालकांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद प्रसाद रघुनाथप्रसाद जैन (मुळ रा. हरियाणा. हल्ली रा. चौधरी बिल्डरर्स, पळसे, ता.जि. नाशिक) असे ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. जैन रविवारी (ता. २१) सकाळी दहाच्या सुमारास पळसे येथील विसावा हॉटेल भागात गायींना नैवेद्य देण्यासाठी गेले होते. नैवेद्य देऊन ते घराकडे परतत असतांना पुण्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या अज्ञात चारचाकी कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अजित शिंदे करत आहेत.