नाशिक (प्रतिनिधी): छट पूजेच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मध्य रेल्वेकडून एकूण ७४० विशेष गाड्या विविध मार्गावर धावणार आहेत. मुंबईतून आतापर्यंत २५२ विशेष रेल्वेच्या सेवा सुरू झाल्या असून, आणखी १११ सेवा सुरू होणार आहेत.
पुणे स्थानकावरून २२१ गाड्यांच्या सेवा सुरू असून, पुढील १०६ गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, नागपूर, लातूर आणि दौंड या ठिकाणांहून ३४ गाड्या प्रवाशांसाठी सुरू झाल्या असून, आणखी १६ गाड्यांचे नियोजन केले जाईल.
उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी आणि इतर ठिकाणांसाठी एकूण ३५६ विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. पुढील १९५ विशेष गाड्या लवकरच सुरू केल्या जातील. दक्षिणेकडील प्रवाशांसाठी करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बंगळुरूसह अन्य ठिकाणांसाठी एकूण ४४ गाड्यांची व्यवस्था पूर्ण झाली असून, अजून २० गाड्या उपलब्ध होणार आहेत.
महत्त्वाच्या स्थानकांवर ‘मे आय हेल्प यू’ बूथ सुरू केले असून, तिकीट विक्री केंद्रांची संख्या वाढवली आहे. अतिरिक्त आरपीएफ कर्मचारी आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या उपाययोजनांमुळे छट पूजेच्या निमित्ताने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.