नाशिक (प्रतिनिधी): नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी लाभदायी ठरणारी नाशिक-बंगळूरू ही विमानसेवा मंगळवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी ८०% प्रतिसाद लाभला. ३६७ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.
बंगळूरूहून इंडिगोचे २३० आसनी विमान, दररोज दुपारी बंगळूरूहून २.३० वाजता टेकऑफ करून नाशिक विमानतळावर ४.२० वाजता पोहोचेल, सायंकाळी ४.५० वाजता नाशिकहून निघून बंगळूरू विमानतळावर सायंकाळी ६.३० वाजता पोहोचेल. सध्या कारने या प्रवासासाठी लागणारा १८ तासांचा कालावधी या विमानसेवेमुळे अवघा १ तास ५० मिनिटांवर आला आहे.
३४०० रुपयांपासून तिकिट दर आणि आठवड्याचे सर्वच दिवस ही सेवा उपलब्ध असेल. नाशिक विमानतळावरून सध्या गोवा, हैद्राबाद, अहमदाबाद, नागपूर, दिल्ली, इंदूर या शहरांकरिता विमानसेवा सुरू असून त्यात, बंगळूरू व चेन्नई करीता विमानसेवा सुरू व्हावी अशी नाशिककरांची मागणी होती, ती इंडिगो कंपनीने अंशतः पूर्ण केली आहे. १० सप्टेंबरपासून बंगळूरू-नाशिक सेवा सुरू करण्याची घोषणा कंपनीने दीड महिन्यांपूर्वी केली होती, त्यानुसार मंगळवारी पहिल्याच फ्लाइटला प्रवाश्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असून उद्योजक, विद्यार्थी, आयटीयन यांच्यासाठी ही सेवा उपयुक्त आहे.