नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): त्रंबकेश्वर रस्त्यावर दि.१९ जुलै रोजी संदीप फाउंडेशन जवळ दुचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात प्रतिक प्रमोद दंडगव्हाळ (वय २४ रा. बोधले नगर, नाशिक) याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता, त्याला अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये दाखल करण्यात आले. परंतु प्रतिक हा उपचार सुरु असतांना कोमात गेला आणि तो मेंदू मृत अवस्थेकडे गेला. त्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या आणि सर्व रिपोर्ट्स बघून अपोलो हॉस्पिटल मधील ब्रेन डेथ कमिटी मधील डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेथ (मेंदू मृत ) घोषित केले.
डॉक्टरांनी प्रतिकच्या आई-वडिलांनी प्रतिकचं अवयव दान करण्याचा सल्ला दिला. प्रतिकचे सर्व नातेवाईक आणि आई- वडील यांनी देखील वेळ वाया न घालवता अवयवदान करण्यास सहमती दर्शवली आणि लगेच प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाच्या ZTCC या अवयवदान कमिटीला कळविण्यात आले आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अपोलो हॉस्पिटलमध्ये लगेचच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील सुरू करण्यात आली.
यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलचे युरोसर्जन डॉ. प्रवीण गोवर्धने आणि किडनी विकार तज्ञ डॉ.प्रकाश उगले म्हणाले की “अवयवदानाची सगळ्यात जास्त गरज भारतात आहे, तसेच नाशिकमध्ये अवयव दानाचं प्रमाण अत्यंत कमी आहे, वयाच्या २४ व्या वर्षी आपला मुलगा मेंदू मृत अवस्थेत असताना त्याच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी अवयव दानाची सहमती दिली, ही खूप मोठी गोष्ट आहे, अवयवदान हे सर्व श्रेष्ठ दान असून समाज प्रबोधनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल दंडगव्हाळ परिवाराने उचललेले आहे. “
यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा म्हणाले की, आरोग्य संचालनालयाकडून अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे ब्रेन डेथ कमिटी नियुक्त करण्यात आली आहे, त्यामुळे अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये ही प्रक्रिया सुलभ पणे पार पडली. प्रतिकच्या अवयवदानातून ६ रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे.
यावेळी प्रतिकचे हृदय, यकृत, २ किडनी, डोळे (Cornea) हे अवयव दान करण्यात आले. अवयवदानाच्या आणि अवयव प्रत्यारोपणाच्या संपूर्ण प्रक्रियेत अपोलो हॉस्पिटलमधील मेंदू व मणके शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. संजय वेखंडे, मेंदुविकार तज्ञ डॉ. जितेंद्र शुक्ल, किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉ. मोहन पटेल, हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अभय सिंग वालिया, युरोसर्जन डॉ. किशोर वाणी, डॉ. अमोलकुमार पाटील अतिदक्षता विभागाचे डॉ. अतुल सांगळे, डॉ. अमोल खोळमकर, डॉ. प्रविण ताजने, डॉ. बालाजी वड्डी, डॉ. राहुल भामरे भुलतज्ञ भुलतज्ञ डॉ. भूपेश पराते, डॉ. चेतन भंडारे, डॉ. अमिता टिपरे आणि अवयव प्रत्यारोपण समन्वयक सौ. चारुशीला जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.
तसेच ZTCC पुणे येथील सेंट्रल समन्वयक सौ. आरती गोखले यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि अवयव दानाची प्रक्रिया सुखरूपपणे पार पाडली.
प्रतिकच्या कुटुंबांनी अत्यंत दुःखाच्या क्षणी अवयावदानाबद्दल दाखवलेली सकारात्मकता बघता प्रतिकला मानवंदना देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते.