नाशिक (प्रतिनिधी): सातपूर पोलिस ठाण्यात नेमणूक असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक संशयित धनराज सोनू गावित (५७), हवालदार कांतीलाल रघुनाथ गायकवाड, या दोघा लाचखोर पोलिसांना २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदारांनी सहा वर्षांपूर्वी आनंदवल्ली शिवारातील एका गृहप्रकल्पात २३ लाख ५० हजार रुपये भरून सदनिका नोंदणी केली होती. त्यासाठी धनादेशाद्वारे २१ हजार रुपये दिले होते. सहा वर्षांचा कालावधी उलटूनसुद्धा तक्रारदारांना सदनिकेची कागदपत्रे किंवा आगाऊ दिलेली २१ हजारांची रक्कम बांधकाम व्यावसायिकाने परत केली नाही. यामुळे त्यांनी सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या तक्रार अर्जाची चौकशी गावित व गायकवाड हे करत होते.
दहा दिवसांपूर्वी या पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासोबत तक्रारदाराची चर्चा घडवून आणली. यावेळी त्यांना धनादेश पुन्हा परत करण्यात आला. या मोबदल्यात दोन्ही पोलिसांनी त्यांच्याकडे बक्षीस म्हणून २ हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यानंतर गायकवाड यांनी मागणी केली, त्यानंतर पंचासमक्ष दोन हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
![]()


