नाशिक (प्रतिनिधी): विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय तांत्रिक अधिकारी राजेंद्र भागवत केदारे (५७) यांनी १० हजार रुपयांची लाच घेतली असता मंगळवारी (दि.२४) त्यांना ताब्यात घेण्यात आले. तक्रारदाराच्या नातेवाइकाच्या बाजूने लागलेल्या अपिलाच्या निकालाची प्रत देण्यासाठी त्यांनी हा मोबदला घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.
तक्रारदाराच्या भावजयी या महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. त्यांना जिल्हा पुरवठा विभागाकडून स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात आले आहे. त्यावर अपील सुरू होते. निकाल भावजयीच्या बाजूने लागला होता. प्रत त्यांना देण्यासाठी केदारे याने १५ हजारांची लाचेची मागणी केली.
निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. केदारे यांनी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
![]()


