नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर तालुक्यातील रामनगर येथील प्राथमिक आश्रमशाळेच्या आवारात पाच हजार रुपयांची लाच शिपायामार्फत स्वीकारणारा लाचखोर मुख्याध्यापक संशयित सुनील वसंत पाटील (५४) याच्यासह शिपाई बाळू हिरामण निकम (५५) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जाळ्यात घेतले.
मुख्याध्यापक पाटील हे प्राथमिक आश्रमशाळा रामनगर येथे कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या २०१६ ते २०२३ सालापर्यंतच्या वेतनाच्या फरकाबाबतची फाईल मंजूर करून फरकाची रक्कम मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी ३१ जुलै रोजी केली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार केली होती पथकाने शहानिशा करत खात्री पटविली. यानुसार पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, विलास निकम आदींनी मंगळवारी (दि. १३) आश्रमशाळेच्या आवारात सापळा रचला.
यावेळी तक्रारदाराला निकम यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगून पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात पंच व साक्षीदारांसमवेत रक्कम स्वीकारली असता पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.