नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वरला एक भीषण अपघात घडला आहे. संत निवृत्तीनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव कारने महिलेसह हातगाडीला फरफटत नेले. या दुर्घटनेत महिला ठार झाली आहे. या अपघातामुळे शहरात अतिशय हळहळ व्यक्त होत आहे.
संत निवृत्तीनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेले वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी अनेक व्यावसायिक हातगाड्यांवर विविध व्यवसाय करतात. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास या रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे.
याठिकाणी व्यवसाय करणारी महिला यशोदा प्रविण कांबळे या आपल्या हातगाड्यासह घराकडे जात होती. त्याचवेळी त्र्यंबक नगरपरिषदेकडून श्री पंचायती आवाहन आखाड्याकडे एक कार (होंडासिटी कार क्र. MH 04 8902) भरधाव वेगाने जात होती. या कारने महिलेला जोरदार धडक दिली.
तसेच, तिच्यासह हातगाडीला फरफटत नेले. या अपघातात महिलेच्या डोके, हात, पाय आणि जवळपास सर्व शरीराला जोरदार मार लागला. त्यामुळे त्या जागीच मरण पावल्या. हा अपघात घडताच कार चालक तेथून फरार झाला आहे.
याप्रकरणी मृत महिलेचा दीर अंकुश हरिभाऊ कांबळे (वय ३८ रा. इंदिरानगर, खंडेराव मंदिराच्या मागे, त्र्यंबकेश्वर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद सत्यनारायणपुरी (रा. आवाहन आखाडा) याच्या विरोधात त्र्यंबक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
कारचालक आनंद हा अतिशय वेगाने कार चालवत होता. त्याच्या बेदरकारपणामुळेच महिलेचा जीव गेला आहे. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. एल. जगताप करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी आनंद यास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक आवाहन आखाड्यात गेले. मात्र, आनंद सत्यनारायण पुरी याची तब्ब्येत अचानक बिघडल्याने त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.