नाशिक (प्रतिनिधी): येथील दिंडोरी-नाशिक रस्त्यावरील रणतळेजवळ बससह तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून बस आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरीकडून नाशिककडे जाणारी बस क्रमांक (एमएच ४० एन ९४३२) ही बस रणतळेजवळील चढा चढत असतांना नाशिकहून दिंडोरीच्या दिशेने उतारावरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो क्रमांक (एमएच १५ बीसी ६२२६) या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने बसच्या पुढील व मागच्या चाकास धडक दिली.
त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली.
या बसने एकूण ३४ प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून बाकी सुखरूप आहेत. तर बसच्या मागे असलेली अल्टो कार क्रमांक (एमएच ०५ सीए १४४९) ही बसला पाठीमागून धडकली. त्यामुळे तिन्ही वाहनांचा विचित्र अपघात घडला.