Breaking

नाशिक: तीन लाखांची लाच घेताना उपविभागीय अभियंत्याला रंगेहात अटक; सहकारी अभियंता फरार

नाशिक। दि. १ एप्रिल २०२६: रस्ते कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) जिल्हा परिषद कार्यालयात सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता करण्यात आली. या प्रकरणातील दुसरा शाखा अभियंता फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात हवामान अस्थिर; नाशिक-जळगावसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीटीची शक्यता

विठ्ठल बालाजी पठाडे (वय ५६), उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, चांदवड हे अटक करण्यात आलेले अधिकारी असून कृष्णकांत जिभाऊ देवरे (वय २८), शाखा अभियंता हा संशयित सध्या फरार आहे.

तक्रारदाराने बांधकाम विभागात नोंदणीकृत कंपनीमार्फत चांदवड तालुक्यातील रस्ते सुधारणा व डांबरीकरणाचे काम घेतले होते. सुमारे ९० लाख रुपयांच्या निविदेतून तक्रारदाराला ७२.८९ लाख रुपयांचे काम मिळाले होते. कामाच्या टप्प्याटप्प्याने ४१ लाख रुपये अदा झाले असले, तरी उर्वरित सुमारे १० लाखांचे बिल प्रलंबित होते.

🔎 हे वाचलं का?:  गोदावरीतील पाणवेली निर्मूलनासाठी यंत्रणांनी कार्यवाही करावी : विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम

हे बिल मंजूर करून देण्यासाठी तसेच पूर्वीच्या देयकाच्या मोबदल्यात ‘बक्षीस’ म्हणून पठाडे यांनी ३ लाख रुपये, तर देवरे यांनी २.६७ लाख रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. एकूण ५.६७ लाख रुपये देण्यास नकार देत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आनंदे गावे गाणे’ मैफलचे बुधवारी (दि. १ एप्रिल) आयोजन

त्यानुसार पथकाने सापळा रचून जिल्हा परिषद कार्यालयात पठाडे यांना ३ लाख रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली. देवरे यांनी उर्वरित रक्कम चांदवड येथील निवासस्थानी स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती; मात्र कारवाईपूर्वीच तो फरार झाला. संबंधित संशयिताचा शोध घेण्यासाठी पथक प्रयत्न करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790