नाशिक (प्रतिनिधी): राज्यात आजपासून मान्सून सक्रीय होत असला तरी हंगामाच्या सुरुवातीपासून दडी मारलेल्या पावसाच्या समाधानकारक वृष्टीकरिता नाशिक जिल्ह्याला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दोन दिवसांपासून ढग दाटल्याने तापमानात किचिंत घट झाली आहे. ९ सप्टेंबरनंतर काही प्रमाणात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे.
श्रावणात यंदा तापमानवाढीमुळे नाशिककरांना उकाड्याचा सामना करावा लागला. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान २९.५ अंश, तर किमान तापमान २१.२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. तर आर्द्रता ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने काहीसा गारवा निर्माण झाला आहे.
वाऱ्याचा वेग प्रतितास पाच किलोमीटर असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, ८ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर, ९ सप्टेंबरपासून मध्यम स्वरूपात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, जायकवाडीत पाणी कमी असल्याने पाणी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे.