नाशिक (प्रतिनिधी): ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. मात्र काही दिवसांत थंडीचा जोर वाढणार आहे. दरम्यान धुके आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आकाश ढगाळ राहून हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात धुके वाढले असून ढगाळ वातावरण असले तरी विविध ठिकाणी थंडीची लाट आली आहे. मात्रकाही भागात मात्र अवकाळीचे संकट कायम आहे. अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी जास्त होत आहे.
बंगालच्या उपसागरावरून प्रामुख्याने दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे या भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात ११० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांच्या तीव्रतेनुसार थंडी कमी-अधिक होत असून, उत्तरेकडील राज्यात दाट धुके अनुभवायला मिळत आहे.
राज्यातील काही भागात येत्या 4 दिवसात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या बऱ्याच भागातही सकाळी उशिरापर्यंत धुके पाहायला मिळत आहे. दिवसभर असलेल्या अंशतः ढगाळ हवामानामुळे झाल्याने थंडी पुन्हा गायब झाली आहे. मंगळवारी (ता. १४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे.
मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तर किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.