पुणे (प्रतिनिधी): राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येणाऱ्या बुधवारी, दि. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दि. १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी जाहीर करण्याबाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, दिनांक १८ व १९ रोजी शाळांना कोणतीही सार्वत्रिक सुटी जाहीर केलेली नसून सर्व शाळा सुरू राहतील, असे स्पष्ट निर्देश राज्याचे प्रभारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी जाहीर करण्यासंदर्भात शासनाकडून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. येत्या १८, १९ व २० या तीन दिवशी शाळांना सुटी घेण्याबाबत मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा, असा उल्लेख या परिपत्रकामध्ये करण्यात आला होता. परंतु, गरज नसतानाही दि. १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी सुटी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू होती. यासंदर्भात मांढरे म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.
सार्वजनिक सुटी नाही:
ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्त्ती झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकारात सुटी जाहीर करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा सुरू राहणार आहेत. राज्यातील सर्व शाळांना सरसकट व सार्वजनिक सुटी नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. कोणत्याही शाळा अनावश्यकरीत्या बंद राहणार नाहीत, अशी सूचना सर्व शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.