नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून बुधवारी (दि. २५) व गुरुवारी (दि. २७) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मोसमी नैऋत्य वाऱ्यांनी दिशा बदलली असून ते २४ सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातच्या बहुतांश भागातून माघारी परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हजेरी लावली. येत्या तीन दिवसांत म्हणजे २५, २६ व २७ सप्टेंबरला राज्याच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून ठाणे व नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
धरणक्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात पाणी सोडले जाईल, त्यामुळे पूरप्रवण क्षेत्रातील भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार २५ सप्टेंबर रोजी धुळे,नंदुरबार, कोल्हापुर, जालना, अकोला, परभणी, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, वाशिम, पालघर, मुंबई या जिल्ह्यात वादळवाऱ्यासह मेघगर्जना होणार असून जोरदार पावसाची शक्यता आहे. २६ सप्टेंबर रोजी नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जळगाव, सांगली, लातूर, ठाणे, मुंबई, धाराशिव, जालना, चंद्रपूर, यवतमाळ येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे.