धक्कादायक: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो, अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या पाठोपाठ धुळे शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. शहरातील प्रमोद नगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई-वडिलांसह दोन मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नाशिक येथील पती-पत्नी व मुलीच्या आत्महत्येमुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाला असताना आता धुळ्यातही एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या करून आपला जीवनप्रवास थांबवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरातील गिरासे कुटुंबात ही घटना घडली आहे. समर्थ कॉलनीत प्रवीण मानसिंग गिरासे हे आपल्या कुटुंबासह राहत होते. पण त्यांनी आज अचानक आत्महत्या केल्याचे वृत्त आले. प्रवीण गिरासे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. तर गीता प्रवीण गिरासे, मितेश प्रवीण गिरासे व सोहम प्रवीण गिरासे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे समजते.

एकाच कुटुंबातील चौघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या कुटुंबाने मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते. या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

कुटुंबाचे प्रमुख असणारे प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान असून पत्नी आणि दोन मुलांसमवेत ते प्रमोद नगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते. मात्र, मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसत होते. प्रवीण गिरासे यांची बहीण या आज सकाळच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आला होता. तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आई-वडिलांनी सोन्यासारख्या दोन लेकरांसह आत्महत्या का केली असावी, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलीस तपासातून या सगळ्याचा उलगडा होईल !

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790