सिंहस्थ २०२७ पूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

नाशिक। दि. २७ मार्च २०२६: त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड येथे सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण मार्फत जलशुद्धीकरण व पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे कुंभमेळ्यादरम्यान कुंडातील पाणी स्नानयोग्य आणि स्वच्छ राखण्यास मदत होणार आहे.

त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले कुशावर्त कुंड हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी प्रमुख स्नानस्थळ आहे. सध्या या कुंडातील पाण्याचा पुनर्वापर चक्र कालावधी सुमारे ९ तासांचा आहे. प्रस्तावित जलशुद्धीकरण यंत्रणेमुळे हा कालावधी ३ तासांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, निर्माल्य थेट कुंडात विसर्जित होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार असून स्वतंत्र देखभाल व संचालन व्यवस्था उभारली जाणार आहे.
या प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, ‘‘कुशावर्त कुंडाला प्रत्येक भाविकासाठी विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी पवित्र स्थळांवरील पाणी केवळ स्वच्छच नव्हे, तर स्वच्छ दिसणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. भाविकांना ते स्नान करत असलेल्या पाण्याची निर्मळता प्रत्यक्ष दिसली पाहिजे. सिंहस्थ २०२७च्या अनुषंगाने कुशावर्त कुंडात ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे.’’

दरम्यान, राज्य पुरातत्त्व विभागाकडून कुशावर्त परिसराचे जतन व संवर्धन तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. यामध्ये कुंड परिसरातील मंदिरे व प्लॅटफॉर्मचे जीर्णोद्धार, गंगा-गोदावरी मंदिर प्रांगण, कुंडाच्या पायऱ्या, कपडे बदलण्याच्या खोल्या तसेच संपूर्ण परिसरातील प्रकाशयोजना यांचा समावेश आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरातील एकूण नऊ पवित्र स्थळांच्या पुनरुज्जीवनासाठी कुंभमेळा प्राधिकरण प्रयत्नशील असून यात इंद्र कुंड, बिल्व तीर्थ, प्रयाग तीर्थ, मुकुंदेश्वर तीर्थ, संगम तीर्थ, गौतमेश्वर मंदिर आणि गौतमेश्वर तलाव यांचा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790