खांडे मळ्यातील रस्त्याचे खडीकरण करा; जगतापनगर, कालिका पार्कमधील खड्डे बुजवा: शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनची मागणी
नाशिक (प्रतिनिधी): खांडे मळ्यातील लासुरे हॉस्पिटल ते दक्षता सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण करावे, जगतापनगर, कालिका पार्कमधील खड्डे बुजवावे, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनने केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांना देण्यात आले आहे.
नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक २४ मधील कालिकानगर, जगतापनगर येथील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, खांडे मळ्यातील लासुरे हॉस्पिटल ते मनोमय, दक्षता सोसायटीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे, या रस्त्याचे खडीकरण करावे, अशी मागणी तेथील रहिवाशांच्या तक्रारीनंतर शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशिला गायकवाड (देशमुख), शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे यांच्यासह रहिवाशी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन गुरुवारी, २२ जुलै २०२१ रोजी महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि शहर अभियंता संजय घुगे यांना देण्यात आले होते. यानंतर लासुरे हॉस्पिटलच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले, मुरूम टाकण्यात आला, बुजलेले चेंबर मोकळे करण्यात आले, या तात्पुरत्या मलमपट्टीने रस्त्याची दुर्दशा थांबलेली नाही. रहिवाशांना पायी चालणेसुद्धा कठीण झाले आहे. लासुरे हॉस्पिटलपासून दक्षता सोसायटीपर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण करून रस्ता सुस्थितीत आणावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कालिकानगर, जगतापनगर येथील रस्त्यावरील खड्डेही पूर्णपणे बुजविण्यात आलेले नाहीत.