नाशिक (प्रतिनिधी): स्मशानभूमी म्हटलं की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र राहाता शहरातील स्मशानभूमीत सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाष्टक असे अनोखे चित्र दिसून आले असून या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
वडिलांनी आपल्या कन्येचा विवाह सोहळा थेट स्मशानभूमीत लावत अंधश्रद्धेला फाटा दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य.
अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह याच ठिकाणी राहून आपल्या मुलीच शिक्षण पूर्ण केलं. मयुरीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्नासाठी वराची निवड करण्यात आली आणि लग्न थेट स्मशानभूमीतच लावण्याचा निर्णय गायकवाड दाम्पत्याने घेतला. सोहळा सुद्धा अगदी थाटामाटात पार पडला.
मयुरी व मनोज यांच्या विवाह सोहळ्यासाठी स्मशानभूमीतच मांडव टाकण्यात आला. सनई चौघाड्यांचा सुरात आणि शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मयुरी आणि मनोजच्या लग्नासाठी लागणारी भांडी गावातील नागरिकांनी मिळून दिली. तर मुलीचे कन्यादान माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा व राजेंद्र पिपाडा यांनी करत विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थित राहत या अनोख्या लग्नात सहभाग घेतला. अंधश्रद्धेला फाटा देणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत केले.
सामाजिक कार्यकर्ते दसरथ तुपे यांनीही यावेळी आपल्या आवाजात मंगलाष्टके म्हणत या नववधूंना शुभेच्छा दिल्या. आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात मनोज आणि मयुरीने थेट स्मशानभूमीत केली असून या विवाह सोहळ्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसून आला. स्मशानभूमी म्हटलं की आयुष्याचा शेवटचा प्रवास हे समीकरण मात्र गायकवाड दाम्पत्याने आपल्या मुलीच्या नवीन प्रवासाची सुरुवात याच ठिकाणाहून करत समाजाला अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेशच दिला हे मात्र नक्की.
या विवाह प्रसंगी शहरातील भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा व त्यांच्या पत्नी ममता भाभी पिपाडा तसेच शहराचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी वधूचे कन्यादान केले. यावेळी दशरथ तुपे, किरण वाबळे,ॲड. सुनील सोनवणे हे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहाता शहरवासीयांनी स्मशानभूमीतील आगळ्यावेगळ्या विवाह सोहळयास उपस्थिती दाखवून विवाह सोहळ्याची शोभा वाढवली.
मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं… :
दरम्यान राहाता येथे मयुरीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले तर शिर्डीत वास्तव्य करणाऱ्या मनोज जयस्वाल यांचंही शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यानंतर दोघेही शिर्डी येथील एका ठिकाणी कामाला असल्याने त्यांची मैत्री झाली. पुढे याच मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. पुढे जाऊन त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. दोघांच्या घरच्यांनीही लग्नाला परवानगी दिली. विवाह सोहळा राहाता शहरात स्मशानभूमीच्या प्रांगणामध्ये थाटामाटामध्ये संपन्न झाला.