नाशिक (प्रतिनिधी): रेल्वेने प्रवासी सुरक्षेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत ‘संरक्षा मोबाईल अॅप’ तयार केले आहे. या अॅपचा मुख्य उद्देश रेल्वेच्या फ्रंटलाइन सेफ्टी श्रेणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवून प्रवासी सुरक्षा सुधारणे हा आहे.
रेल्वे बोर्डाचे ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे सदस्य रविंदर गोयल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आणि विविध रेल्वे विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अॅप सादर करण्यात आले.
रेल्वे बोर्डाने हे अॅप सुरुवातीला १६ विभागांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआई) सहाय्याने रेल्वेच्या डोमेन ज्ञानाला समृद्ध करण्यासाठी हे अॅप सहाय्यभूत ठरेल. ही नवीन सुविधा प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाला विश्वासार्ह बनविण्यासाठी मोठे पाऊल ठरणार आहे.