जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी घेतली ‘कोविडशिल्ड’ लस

नाशिक (प्रतिनिधी): कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. लसीकरणाच्या या दसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व पोलीस अधिक्षक सचिन पाटील या प्रमुख अधिकाऱ्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या न्यु बिटको हॉस्पिटल येथील लसीकरण केंद्रात ‘कोविडशिल्ड’ लस घेतली.

कारोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे: सूरज मांढरे
लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी मिळून लसीकरण करुन घेण्याचा प्रस्ताव काल सर्वांसमक्ष मांडला असतं अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला. 

सुरक्षेची उपाय योजना म्हणून शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांतून ‘कोविडशिल्ड’ लस सर्वांसाठी प्राप्त झाली आहे. आपल्या जिल्ह्यात 16 हजारपेक्षा अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे व ते सर्व जण ठणठणीत आहेत. यापुढे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना लसीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेतील प्रमुख अधिकारी म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी आज लस घेतली आहे. पुढे ज्यावेळी नागरिकांना एसएमएस येईल, त्यावेळी लसीकरणाच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.

कोरानाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण महत्वाची उपाययोजना: कैलास जाधव
आरोग्य सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसुत्री सोबतच लसीकरण ही महत्वाची उपाययोजना आहे. या चतुसुत्रीच्या माध्यमातून हर्डइम्युनिटी वाढण्यासाठी मदत होईल, असे महानगरपालिका आयुक्त जाधव यांनी सांगितले.

आधी केले, मग सांगितले याउक्ती प्रमाणे कोविड19 या महामारीवरील उपाय म्हणून करण्यात येणारे लसीकरणाविषयीचे गैरसमज व भिती दूर करण्यासाठी आम्ही प्रमुख अधिकाऱ्यांनी लसीकरण करून घेतले आहे. नागरिकांनी देखील लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बनसोड यांनी केले आहे.

दुसऱ्या टप्प्यात आजपासून प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण सुरू झाले आहे. याअनुषंगाने कुटूंब प्रमुख म्हणून स्वत:चे लसीकरण करून घेतले आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लसीकरण करून लसीकरणाची मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी यावेळी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group