नाशिक (प्रतिनिधी): शिर्डीहून दर्शन घेऊन मुंबईकडे परतणाऱ्या कुटुंबियांच्या कारला नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळील तारांगणपाडा शिवारात (चॅनल नंबर ६२३) अपघात होऊन पिता- पुत्रासह तीन ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. अतिवेगात असलेल्या कारचे पुढील दोन टायर फुटून ती दुभाजकावर धडकल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारला (एमएच ४६, पी ९४२५) झालेल्या या भीषण अपघातात गीता रमेशचंद्र अग्रवाल (७२), चालक अनुज रमेश गोयल (५२), मुलगा निर्मय अनुज गोयल (१६, सर्व रा. खारघर, नवी मुंबई) यांचा मृत्यू झाला तर रमेशचंद्र अग्रवाल (८०), मीती अनुज गोयल (४५), दिव्यांशी अनुज गोयल (२१, सर्व रा. खारघर, नवी मुंबई) हे गंभीर जखमी झाले आहेत.
शिर्डीहून दर्शन करून मुंबईकडे प्रवास करत असताना समृद्धी महामार्गावरुन इगतपुरी व नंतर मुंबई-आग्रा महामार्गाने मुंबईकडे जाण्याचा त्यांचा बेत होता. परंतु, इगतपुरी येण्याआधीच कारला अपघात झाला. मयत व गंभीर जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेने एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, घटनास्थळावरून वाहन बाजूला करून अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल तसरे, सहायक निरीक्षक गणेश बुवा, नीलेश देवराज तपास करत आहेत.