नाशिक (प्रतिनिधी): मुंबईतील कुलाबा वेधशाळेने राज्यभरातील जवळजवळ २८ जिल्ह्यांना आगामी दोन तीन दिवसांत गारपिटीसह दमदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा इशारा दिलेल्या जिल्ह्यांत धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वेध शाळेकडून वर्तविण्यात आली आहे.
तर नंदुरबार, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. महाराष्ट्र ते उत्तर कर्नाटकदरम्यान असलेला कमी दाबाचा पट्टा आणि विदर्भ व लगतच्या भागावरील चक्रीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यावर गुरूवार व शुक्रवारी अवकाळी पावसाचे सावट आहे.