नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या व अतिप्रमाणात लेझरचा वापर झाल्याने काही गणेश भक्तांच्या डोळ्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाल्याचे व काहींना हृदयाचाही त्रास संभवत असल्याच्या तक्रारी खुद्द डॉक्टरांच्या संघटनांनीच केल्याने त्याची दखल पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली.
आगामी नवरात्रोत्सवात लेझर न वापरण्याची सक्त ताकीद देत डीजे व लेझरचा वापर करणाऱ्यांवर निर्बंध लावण्याच्या सूचना पोलिस यंत्रणेला भुसे यांनी दिल्या. दरम्यान, यासंदर्भात पोलिस आयुक्तालयाकडूनही नवरात्रोत्सवात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजेचालकांविरोधात सक्तीने कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गणेशोत्सवात मर्यादित आवाजात डीजे वाजवण्याचे पालकमंत्री भुसे यांच्या आदेशानंतरही पोलिसांनी मर्यादा ओलांडणाऱ्या ७ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईचे भुसे यांनी समर्थन करीत या कारवाईत शिवसेनेचे मंडळ असले तरी आपण त्यांना पाठीशी घालणार नाही. न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे, असे निर्देश दिले. तसेच, नेत्ररोगतज्ज्ञ संघटना आणि आयएमए यंानी पत्रकार परिषद घेऊन विसर्जन मिरवणुकीत डीजेचालकांनी लेझरचा अतिवापर केल्याने ६ युवकांच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याचा प्रकार समोर आणला आहे
अटी-शर्तींवरच परवानगी:
येत्या नवरात्रोत्सवात गरबा व दांडिया आयोजित करणाऱ्या मंडळांना डीजे लावण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. साउंड सिस्टिमचा वापर मर्यादित करण्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, लेझर व डीजेचा वापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून आयोजकांना त्या स्वरुपात पोलिस यंत्रणेकडून सूचना देण्यात येत आहे. सामाजिक मंडळांसह काही संस्था दांडियाचे तर काही लॉन्स, हॉटेल्समध्येही हे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. तिथेही डीजे व लेझरचा वापर यापूर्वी झाला आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी पोलिसांनी मंडळांना अटी-शर्तींच्या आधीन परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, पोलिसांची पथके धडक तपासणी मोहीम राबविणार आहेत.
…तर मंडळांवर कारवाई:
नवरात्रोत्सवात ध्वनिक्षेपक मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर कारवाई केली जाणार आहे. लेझर वापराबाबत पोलिसांकडे कुठल्याही स्वरुपाची तक्रार नाही. तसेच लेझर वापरण्यास बंदीबाबत कुठल्याही स्वरूपाच्या सूचना शासनाकडून प्राप्त नाही. अधिकृत तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.
– डॉ. सीताराम कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त