नाशिक (प्रतिनिधी): पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्यानंतर शहरातील किराणा व्यावसायिकांनी सोमवारपासून आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. काही विशिष्ट पोलिस अधिकाऱ्यांकडून विशिष्ट किराणा दुकानदारांना लक्ष्य केले जात असल्याने थेट किराणा दुकाने बंद करण्याचा निर्णय व तसे पत्र पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना नाशिकच्या किराणा व्यावसायिक संघटनांनी पाठविले होते. तूर्तास ही बंदची परिस्थिती टळली आहे.
राज्य शासनाने दिलेल्या नव्या सवलतीनुसार अत्यावश्यक सेवेतील किराणा व भाजीपाला यांसारखी दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सध्या सुरू राहतात. मात्र ही वेळ अत्यल्प असून मोठी गर्दी या वेळात बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते आहे. यातही दुकानदार कसरत करून वेळेची मर्यादा तसेच ग्राहकांचा रेटा याचे गणित बसवत आहेत. मात्र शहराच्या रविवार कारंजा, सिडको, यासारख्या काही विशिष्ट बाजारपेठांमध्ये काही विशिष्ट पोलिस अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असून दंडाच्या भरमसाठ रकमेच्या पावत्या विविध कारणे देत फाडल्या जात आहेत.
काही काही व्यापाऱ्यांकडे तर दोन-तीन वेळेस अशाच पद्धतीने कारवाई केली गेली असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शनिवारी याच पद्धतीने काही ठिकाणी कारवाई झाल्यानंतर किराणा व्यापार यांच्या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत मर्यादा घालून दिलेल्या वेळेच्या पूर्वी तसेच नियमांचे पालन केलेले असताना देखील दंडाच्या पावत्या का असा प्रश्न उपस्थित करत सोमवारपासून किराणा दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पालकमंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांनाही हे पत्र पाठवण्यात आले होते. आता काहीही झाले तरी माघार नाही अशी भूमिका संतप्त व्यापाऱ्यांनी घेतली होती.
मात्र रविवारी सकाळी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत यापुढे असा प्रकार कुठल्याही अधिकाऱ्यांकडून होणार नाही. व्यापाऱ्यांनीदेखील मास्क नसेल त्याला दुकानात प्रवेश देऊ नये, वेळेच्या मर्यादा पाळाव्यात व ज्या अधिकाऱ्यानी जाणीवपूर्वक कारवाया केल्या असतील त्याचीही चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी किराणा दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. यामुळे आजपासून शहरातील सर्व दुकाने सुरळीत सुरू राहणार आहेत.