नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूरसह सरकारवाडा, आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, सातपूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोनसाखळी ओरबडण्यासह विक्री आणि खरेदीदार सराफाच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या.
मुख्य संशयित रेकार्डवरील गुन्हेगार असून, या टोळीमुळे १३ सोनसाखळी खेचण्याच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. पोलिसांनी संशयितांकडून १० लाख ८० हजारांच्या सोन्यासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सचिन साहेबराव पगार (३१, रा. संतोषीमातानगर, सातपूर), नीलेश कमलाकर शिरसाट (३०, रा. सार्थ नंदनवन अपार्टमेंट, अशोका कॉलेजजवळ, चांदशी), आकाश अनिल खैरनार (२४, रा. चांदशी), निरंजन साहेबराव पगार (३७, रा. संतोषीमातानगर, सातपूर), मुकूंदा दादा माने (५०, रा. चांदशी), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
गुन्ह्याचा तपास गंगापूर पोलिसांसह शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोनची पथके करीत असताना घटना घडल्या तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते. त्यातून मुख्य संशयित सचिन पगार याचा शोध घेत त्यास अटक केली. चौकशीतून अनेकांची नावे समोर आली. संशयित सचिन हा सदर सोने त्याचा भाऊ निरंजन यास द्यायचा. निरंजन ते सोने सराफ माने याला विकायचा. तर सचिन याने नीलेश व आकाश याच्या संगतीने सोनसाखळी ओरबाडत असल्याची कबुली दिली. संशयितांकडून चोरीचे १८ तोळे सोन्याची लगड असा १० लाख ८० हजारांचा ऐवज व २५ हजारांची दुचाकी असा ११ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
यामध्ये गंगापूर हद्दीतील ५, सरकारवाडा व आडगाव हद्दीतील प्रत्येकी दोन तर, पंचवटी, म्हसरुळ, सातपूर आणि इंदिरानगर हद्दीतील प्रत्येकी १ असे १३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. सदर कामगिरी गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, विजय ढमाळ, रणजित नलावडे यांच्या पथकाने बजावली.