नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेकडून फटाके स्टॉल घेण्यासाठी येणाऱ्यांना आता प्रथम तत्त्वानुसार प्राधान्य दिले जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या विविध कर विभागाकडून फटाके विक्री स्टॉल्सच्या दुसऱ्या टप्प्यातील लिलाव घेण्यात आले.
९७ पैकी अवघे तीस स्टॉल्सचे लिलाव झाले. ६७ फटाके स्टॉल्ससाठी प्रथम येईल, त्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी लिलाव बोलीत दहा टक्के वाढ केली जाणार आहे.
दिवाळीनिमित्त महापालिकेकडून दरवर्षी फटाक्यांचे स्टॉल लावले जातात. या माध्यमातून महापालिकेला उत्पन्न मिळते. यंदापासून फटाके स्टॉलचा आकार वाढविण्यात आला आहे. जेणेकरून महापालिकेच्या जागांवर इच्छुकांची संख्या वाढेल.
परंतु फटाक्यांच्या स्टॉलचा आकार वाढवूनदेखील प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सहा विभागात २१६ स्टॉल्ससाठी विभागीय कार्यालयांमध्ये लिलाव झाले. पहिल्या टप्प्यात ११९ स्टॉल्सला प्रतिसाद मिळाला.
लिलावातून महापालिकेला पंधरा लाख रुपयांचा महसुल मिळाला. ९७ स्टॉल्सचे लिलाव तहकूब करण्यात आले. गुरुवारी (ता. २६) दुसऱ्यांदा प्रक्रिया राबविली गेली. पश्चिम विभागात २६, सिडकोत दोन, नाशिक रोड व सातपूर प्रत्येकी एक असे एकूण तीस ३० स्टॉल्स लिलावात गेले.
पश्चिम विभागात नऊ, पूर्व ७, नाशिक रोड २३, सिडको २० व सातपूर विभागात आठ, असे एकूण ६७ स्टॉल्सचे लिलाव तहकूब करण्यात आले.
त्यामुळे आता लिलाव घेतले जाणार नाही. त्याऐवजी प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देत लिलाव बोलीत दहा टक्के वाढ करून स्टॉल्सचे वाटप केले जाणार आहे.