नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा परिसरातून तोतया आयपीएस (भारतीय पोलीस सेवा), रेव्हेन्युसह वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या वर्दीं आणि साहित्य बाळगणाऱ्यास गजाआड करण्यात आले आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने छापा टाकत त्याच्याकडून महागड्या मोबाईलसह संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
गौरव रामाअछेबर मिश्रा (३४, रा. फ्लॅट १००२, बी विंग, हरीविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा) असे संशयित तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे अंमलदार संजय सानप यांच्या फिर्यादीनुसार, युनिट दोनचे निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना या तोतयाची खबर मिळाली असता, त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयिताला त्याच्या घरातून ताब्यात घेत चौकशी केली.
संशयित वाणिज्य शाखेचा पदवीधर असून विवाहित आहे. तसेच तो आई-वडिलांसह याठिकाणी वास्तव्यास आहे. त्याच्या घरझडतीतून आयपीएसच्या वर्दीसह कागदपत्रेही सापडली आहेत. तसेच, याचा वापर करून त्याने कोणाला गंडविले, शासकीय वर्दी बाळगण्यामागील त्याचा उद्देश, यासंदर्भात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल केला असून, सहायक निरीक्षक भूषण सोनार हे तपास करीत आहेत.
घरात काय काय सापडले:
तोतया संशयिताच्या घरातील कपाटातून शासकीय वर्दीसह साहित्य सापडले. पोलिसांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांची शासकीय टोपी, महाराष्ट्र पोलिसचा लोगो असलेले दोन चिनी मातीचे कप, लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीचा (एबीएसएनएए) लोगो असलेला एक कप, पोलिसांच्या शासकीय वाहनांवरील अंबर व लाल-निळे दिवे, सायरन, बंद अवस्थेतील दोन वॉकीटॉकी, विविध कागदपत्रे, दोन लाख रुपये किमतीचे दोन मोबाइल, ४० हजार रुपयांचा लॅपटॉप, ‘एसीपी’ दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश, खाकी शर्टवर तीन पंचकोनी स्टार, महसूल अधिकाऱ्याचा गणवेश, धातूचे लोगो, चामडी बेल्ट, ‘आयपीएस’ व ‘मपोसे’ची शासकीय टोपी आणि खांद्यावरील बॅच, पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशासोबतची तलवार, बनावट स्टॅम्प आदी साहित्य जप्त केले आहे.