नाशिक (प्रतिनिधी): लोकायुक्तांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून जेलरोड येथील फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणाची नीट चौकशी केली असता उमेश उदावंत या व्यक्तीचे नाव समोर आले होते. या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्या डिजिटल सहीचे स्कॅन व बनावट सह्या करून नियुक्तीपत्र देण्यात आले होते.
तरुणांच्या बेरोजगारीचा फायदा घेऊन व खोटे आश्वासन देऊन तब्बल १८० लोकांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत खोटी भरती करताना राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला आहे. हितेंद्र नायक व त्यांच्या पत्नी नोकरीवर रुजू होण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात गेले. तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे भामट्यांचा हा डाव फसला. व त्यांच्या विरोधात भद्रकाली पोलिसठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली. जिल्हा परिषदेमध्ये नोकरी मिळवून देऊ असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार बघता नाशिक जिल्ह्यामध्ये अशाप्रकारचे मोठे रॅकेट कार्यरत आहे कि काय? असे प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.