नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीतील सुयोग हॉस्पिटलमधील डॉ. कैलास राठी यांच्यावर एका तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. २३) रात्री ९.३० वाजता घडला होता… या हल्ल्यात डॉ. राठी गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल्स येथे उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी महिलेच्या पतीने आर्थिक वादातून हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्या रुग्णालयात २०२२ मध्ये रोहिणी दाते (मोरे) या जनसंपर्क अधिकारी म्हणून कामास होत्या, त्यांचा पती राजेंद्र मोरे हा २०१२ मध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तेव्हापासून संर्शायत डॉ. राठी यांच्या तो संपकांत होता. ओळख वाढल्याने डॉ. राठी यांनी म्हसरुळ परिसरात प्लॉटचा व्यवहार केला होता. यावरून दोन वर्षांपासून आर्थिक वाद सुरू होता.
डॉ. राठी यांनी संशयित मोरे याच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. त्यामुळे मोरे शुक्रवारी रुग्णालयात चर्चा करण्याकरिता आला होता. डॉ. राठी आणि मोरे केबिनमध्ये चर्चा करत असताना दोघांमध्ये वाद झाला आणि संशयिताने कमरेला लावलेला कोयता काढत राठी यांच्यावर सोळा वार केले.
डॉ. राठी यांनी मदतीकरिता आरडाओरड केल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न केला. आतून दरवाजा बंद असल्याने कर्मचाऱ्यांचा नाइलाज झाला. संशयिताने केबिनचा दरवाजा उघडून पलायन केले, गंभीर जखमी अवस्थेत डॉ. राठी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आर्थिक वादातून हल्ला:
पीआरओ रोहिणी यांचा पती राजेंद्र मोरे (रा. गंगापूर) याच्यासोबत डॉ. राठी यांनी म्हसरुळ परिसरात प्लॉट खरेदी केला आहे. या प्लॉटच्या व्यवहाराचे १५ ते १६ लाख रुपये डॉ. राठी यांना घेणे होते. दोन वर्षांपासून हा वाद सुरू होता. डॉ. राठी पैशांचा तगादा लावत असल्याने संशयिताने हल्ला केला असावा, अशी प्राथमिक माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.