
नाशिक (प्रतिनिधी): दैनिक देशदूतचे संस्थापक आणि उद्योजक देवकिसनजी बस्तीरामजी सारडा (९२) यांचे नाशिक येथे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दुपारी ५.३० वाजता, त्यांचे निवासस्थान, A- 38, नाईस वसाहत, सातपुर येथून द्वारका अमरधाम येथे निघेल. तर अंतिम संस्कार संध्या. ६.१५ वाजता विद्युतदाहिनी मध्ये होणार आहे. देवकिसनजी सारडा यांनी औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले.
नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांत सारडा यांनी भरीव योगदान दिले. सारडा यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सिन्नर व्यापारी बँक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, जळगाव जिल्हा सहकारी बँक, नाशिक औदयोगिक सहकारी वसाहत (नाईस), नाशिक औदयोगिक कारखानदार संघ (निमा), ऑस्टीम, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध संस्थांवर त्यांनी विविध पदे भूषवली आहेत. चतुरस्त्र आणि आपल्या निष्ठांवर घट्ट उभे कणखर व्यक्तिमत्व असलेल्या सारडा यांच्या निधनाने नाशिकच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे.
![]()


