मुंबई (प्रतिनिधी): राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. आरक्षणाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज दुपारी साडेतीन वाजता महत्त्वाची बैठक आहे. बैठकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर चर्चा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय होण्याची शक्यता आहे. अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीत बोलावले आहे. अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दुपारी ३.३० वाजता देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे भेटतील. या तिघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील काही भागांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाने हिंसक स्वरुप धारण केले होते. बीडमध्ये मराठा आंदोलकांकडून राजकीय नेत्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली होती. यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडण्यास नकार दिल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही.
मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारने सोडवावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीत बोलावल्याने उत्सुकता वाढली आहे. अमित शाह मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना काही सूचना देतात का, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र पेटला असताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह प्रचारासाठी फिरत आहेत. मराठा आरक्षणावर तोडगा काढणे केंद्राच्या हातात आहे. मात्र, मोदी आणि शाह प्रचारात व्यस्त आहेत. पंतप्रधान मोदी यांना इतक्या दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरुन बोलायला वेळ मिळाला नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.