नगर (वृत्तसेवा): नेप्ती कांदा मार्केटमधील आडत व्यापारी सय्यद बंधूंना अपघाताचा बनाव करून अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यात अडवले. त्यांच्यावर तलवार, कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. त्यांच्याजवळील सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त रोकड पळवून नेली. ही घटना शनिवारी (७ सप्टेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
ही रक्कम ते शेतकऱ्यांना देण्यासाठी घेऊन चालले होते. शनिवारी रात्री या प्रकरणी कुणालाही अटक झाली नव्हती. नेप्ती कांदा मार्केटमधील समीर ट्रेडिंग कंपनीचे समीर सय्यद व सोहेब सय्यद यांच्यावर हा हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सय्यद बंधू सकाळी ११ वाजेच्या सुमारास कारमधून नगरकडून नेप्ती कांदा मार्केटकडे जात होते. केडगाव बायपास चौकातून बायपास रस्त्याने ते नेप्ती कांदा मार्केटकडे वळाले.
चौकाच्या काही अंतर पुढे आल्यावर एका वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. त्यामुळे त्यांनी कार थांबवताच मागील बाजूने वाहनातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारच्या काचा फोडल्या. दोघा बंधूंवर तलवार, कोयत्याने वार केले. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या कारमध्ये ठेवलेली पैशांची बॅग घेऊन तेथून पोबारा केला. बॅगमध्ये शेतकऱ्यांना मालाचे पैसे देण्यासाठी आणलेली ५० लाखांपेक्षा जास्त रोकड होती.
या हल्ल्याची माहिती मिळताच नेप्ती कांदा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर सय्यद बंधूंना उपचारासाठी नगरच्या खाजगी रुग्णालयात हलवले.