नाशिक (प्रतिनिधी): क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारे आयोजित शेल्टर २०२४ हे प्रदर्शन विकसित नाशिकचे प्रतिबिंब असून नोकरीनिमित्त अनेक शहरात राहण्याचा योग येणाऱ्या आम्हा सर्व अधिकाऱ्यांना सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची भुरळ पडते. त्यामुळेच नाशिकमध्ये एखादे घर असावे अशी मनोमन इच्छा असल्याचा सुर नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी दर्शविला.
20 ते 25 डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर २०२४ चे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, एनएमआरडीएच्या आयुक्त मनीषा खत्री, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय क्रेडाईचे माजी अध्यक्ष जक्शय शाह, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी मंचावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, शेल्टर २०२४ चे समन्वयक गौरव ठक्कर, शेल्टर २०२४ चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनिल कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील, अविनाश शिरोडे, उमेश वानखेडे व रवी महाजन हे मान्यवर देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहसचिव अनिल आहेर यांनी स्वागत केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की, नाशिकचे ब्रॅण्डिंग सर्वदूर व्हावे तसेच सर्व सभासदांना प्लॅटफॉर्म उपस्थित व्हावा या उद्देशाने शेल्टर चे आयोजन करण्यात येते. प्रगतशील नाशिकमध्ये 1, 2 व 3 BHK सोबत स्टुडिओ अपार्टमेंट ते 8 BHK सदनिका निवासी व औद्योगिक प्लॉट, व्यावसायिक जागा, सीनियर सिटीजन हाऊसिंग असे अनेक पर्याय शेल्टर मध्ये उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
9 शिखरांमध्ये वसलेले नाशिक 9 विविध क्षेत्रात प्रगती करत असून दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाची कवाडे उघडून अनेक संधी घेऊन येईल असे उद्गार हे त्यांनी काढले. आगामी नूतन वर्षात स्वच्छ गोदेसाठी सर्वांनी संकल्प करावा असे आवाहन देखील त्यांनी केले.
त्यानंतर आपल्या मनोगतात बोलताना प्रदर्शनाचे समन्वयक गौरव ठक्कर यांनी प्रदर्शनाची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की दर दोन वर्षांनी होणारे शेल्टर हे प्रदर्शन मागील प्रदर्शनापेक्षा अधिक उत्कृष्ठ करण्याचा आमचा मानस असतो.
यावर्षी शेल्टरची वैशिष्ट्ये म्हणजे 100 हून अधिक विकसकांचे 500 हून अधिक पर्याय येथे उपलब्ध असून दररोज दर 3 तासांनी लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे आणि बम्पर बक्षीस –टी.व्ही. एस दुचाकी जिंकण्याची संधी आहे. सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ, नो जीएसटी घोषित केले असून आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट आहे.
क्यु आर कोड स्कॅन करून पूर्व नोंदणी केल्यास प्रवेश मोफत असून सोबतच १८ वर्षाखालील मुलांना प्रवेश मोफत आहे. लहान मुलांसाठी फ्रावशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया असून भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन व सुसज्ज फूड कोर्ट येथे आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा व व्हॅले पार्किंग उपलब्ध आहे.
👉 क्रेडाई चा शेल्टर हा उपक्रम भव्य असून नाशिक मधील विकासाचे प्रतिबिंब आहे. सुंदर असलेले नाशिक सुरक्षित देखील असावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, शहरात विविध ठिकाणी सी. सी. टी. व्ही. लावण्यासाठी क्रेडाई ने नेहमीच सहकार्य केले असून भविष्यात देखील त्यांचे सहकार्य असेल- पोलिस आयुक्त संदीप कर्णिक
👉 आधुनिकता व परंपरा यांचा सुंदर संगम असलेल्या नाशिकमध्ये गेल्या साडे चार वर्षांपासून कार्यरत आहे. नाशिककरांकडून प्रेम व जिव्हाळा मिळाला असल्याने मी मनाने नाशिककरच झाले आहे. आदिवासी बांधवांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावे यासाठी शबरी नॅचरलस् हा ब्रॅण्ड बाजारात आणला आहे. आदिवासी भागातील अजून एक उत्पादन बांबूचा बांधकामात वापर करावा.- लीना बनसोड (व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ)
👉 सुंदर असलेल्या नाशिकच्या भविष्यासाठी शेल्टर हा एक महत्वाचा टप्पा ठरेल. नाशिक प्राधिकरणाचा डेव्हलमेंट प्लॅन सध्या तयार होत असून या प्लॅन साठी सर्वांनी अपेक्षा, सल्ला व सूचना द्याव्यात- मनीषा खत्री (आयुक्त, एमएमआरडीए (नाशिक प्राधिकरण)
शेल्टर २०२४ चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्शय शहा यांची देखील यावेळी समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाचे आभार अनंत ठाकरे यांनी मानले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋशिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन,सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत.