नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राज्यात चार दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात घसरण होत आहे. सरासरी किमान तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत घसरल्याने सकाळी गारठा जाणवत आहे. १९ नोव्हेंबरपासून उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन पर्वतीय क्षेत्रात पुन्हा नवीन पश्चिमी झंझावात निर्माण होत आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होत असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून तेथे पाऊस व बर्फवृष्टी वाढेल. त्यामुळे राज्यात संमिश्र वातावरण राहील, थंडीही वाढेल, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
राज्यात शुक्रवारपासून नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत किमान तापमानात घसरण होईल. वातावरणातील घडामोडींमुळे शनिवारपासून ५ दिवस (१९ ते २३ नोव्हेंबर) कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत वातावरण ढगाळ राहील. त्यामुळे या परिसरात कमाल व किमान तापमानात किंचित वाढ होऊन वातावरण उबदार जाणवेल.
गुरुवारी बंगालच्या उपसागरात निर्माण अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे शुक्रवारी (दि.१७) चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ते १८ नोव्हेंबरला सकाळी बांगलादेश किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अरबी समुद्रातही तयार होणाऱ्या कमी दाब क्षेत्रामुळे दुसरे चक्रीय वारे निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र त्यातून नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात फक्त वातावरण ढगाळ राहील, पावसाची शक्यता नाही.
काही शहरांतील किमान तापमान:
नाशिक १४ निफाड १२ धुळे १२ गोंदिया १५ नागपूर १५ संभाजीनगर १८