नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सगळेच सण, उत्सव अगदी साधेपणाने साजरा केले गेले. त्याचप्रमाणे यंदा ख्रिसमस देखील साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार, नागरिकांच्या दक्षतेचा विचार करता, नाताळ प्रार्थना हि ३ वेगवेगळ्या वेळांमध्ये होणार आहे. तसेच १० वर्ष वयाखालील लहान मुले व ६५ वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेले जेष्ठ नागरिक यांना चर्च मध्ये प्रवेश मिळणार नाही.
ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे ख्रिसमस असून, या सणाची आतुरतेने वाट बघितली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे जगभरातील ख्रिस्ती बांधव व धर्मगुरू यांनी सण साजरा करत असतांना दक्षतेलाही प्राधान्य दिले आहे. त्यानुसार, ख्रिसमसच्या आदल्या रात्री चर्चमध्ये एकत्र येऊन गायली जाणारी नाताळ गाणी यंदा गायली जाणार नाहीत. तसेच, नाशिकच्या सर्व चर्चमध्ये प्रार्थनेच्या दिवशी सकाळी ८, ९ व १० अशा ३ वेळा निश्चित करण्यात आल्या असून, याच वेळेत प्रार्थना होतील. तर, यावेळांमध्ये फक्त १०० जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.