नाशिक (प्रतिनिधी): चुंचाळे शिवारातील अश्विननगरमध्ये घरात सुती दोरीने बांधलेल्या झोक्याशी खेळता-खेळता गळफास लागल्याने दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.
निखील निंबा सैंदाणे (10, रा. चुंचाळे शिवार, अंबड) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चुंचाळे शिवारातील म्हाडा कॉलनीतल्या अश्विनीनगरात सैंदाणे कुटुंबीय राहतात. राहत्या घरात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास निखील हा बांधलेल्या झोक्यात बसून गिरक्या घेत खेळत होता. त्यावेळी त्याचे आई-वडिल शेजाऱ्यांकडे गेले होते. निखील व त्याचा लहान भाऊ घरात दोघेच असताना ते खेळत होते.
त्यावेळी निखीलने झोक्यात बसून गिरक्या घेतल्याने दोरीला पिळ बसला. अधिक पिळ बसल्याने निखिलच्या गळ्याभोवती दोरीचा गळफास बसला आणि झोक्याचा दोर तुटला. त्यामुळे निखील जमिनीवर कोसळला.
हे बघताच त्याच्या लहान भावाने आईवडिलांना बोलावून आणले. भयभीत झालेल्या पालकांनी त्वरित निखीलला खासगी रुग्णालयांत नेले. मात्र, उपचार्थ जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
रात्री आठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात निखीलला मृत घोषित करण्यात आले. त्यावेळी निखीलच्या पालकांनी आक्रोश केला. निखीलचे वडील खासगी कंपनीत कामाला असून, आई गृहिणी आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.