नाशिक (प्रतिनिधी): नाशिककरांना दिलासा देणारी बातमी असून लवकरच शहरातील करवाढ रद्द होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्ष न केलेली घरपट्टी लागू करून नाशिककरांचे कंबरडे मोडणे हा आमचा उद्देश नसून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी कमी करण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यामुळे येत्या काळात करवाढ कमी होऊन नाशिककरांना दिलासा मिळणार का? हे पाहावे लागणार आहे.
नाशिकमध्ये काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की नाशिककरांच्या करवाढ कमी करण्याबाबत शासन विचाराधीन असून लवकरच योग्य कर लागू करण्याबाबत त्यांनी नाशिककरांना आश्वस्त केले.
तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कार्यकाळात नाशिककरांवर लादलेली अवाजवी करवाढ रद्द करण्यासाठी जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिंदे यांचे लक्ष वेधले. त्याचवेळी उद्योगांचीही घरपट्टी कमी करण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना देतानाच मुंबईत बैठक घेऊन याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट केल्याने नाशिककरांची वाढलेली घरपट्टी रद्द केलेली होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 31 मार्च 2018 रोजी एक अधिसूचना काढून 1 एप्रिल 2018 नंतर अस्तित्वात येणाऱ्या नवीन मिळकतींच्या घरपट्टीत पाच ते सहापट वाढ केली होती.
करवाढीला नागरिकांमधून विरोध झाल्यानंतर महासभेने दोनवेळा करवाढ रद्द केली. मात्र मुंढे हे करवाढीवर ठाम असल्यामुळे निर्णय होत नव्हता. नियमानुसार महासभेचा ठराव विखंडित झाला नसल्यामुळे आयुक्त मुंढे यांनी लागू केलेली करवाढ नियमबाह्य असल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात उपस्थित झाला होता.
त्यावर शासनाकडून उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र मागवले आहे. शासनाकडून हे प्रतिज्ञापत्र गेल्यास करवाढ रद्द होऊ शकते, असे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात आणून दिले. औद्योगिक, वाणिज्य व रहिवासी घरपट्टीत दिलासा देण्यासाठी लवकरच नाशिक महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे घेतली जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.