नाशिक: रेल्वे प्रवाशाकडे सापडली 61 लाखांची रोकड

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): धावत्या प्रवासी रेल्वेत गस्त घालणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. २४) ६४ वर्षीय व्यक्तीस ६१ लाख रुपये आणि आठ तोळे सोन्यासह ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली.

दरम्यान, प्राप्तिकर विभागाचे अधिकारी मनमाड रेल्वेस्थानकात दाखल झाल्याने विविध चर्चेला उधाण आले होते.

हावडा-मुंबई मेल व्हाया नागपूर (गाडी क्रमांक १२८१०) या प्रवासी गाडीत रेल्वे सुरक्षा दलाचे गस्तीपथक कर्तव्य बजावत असताना जळगाव ते मनमाडदरम्यान एका व्यक्तीला संशयास्पद सामानासह पकडले.

त्याची चौकशी केली असता त्याने काहीही माहिती दिली नाही. शिवाय, रोकड आणि सामानाबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने मनमाड रेल्वेस्थानकात या व्यक्तीला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिस ठाण्यात आणले व त्याची चौकशी केली.

त्याने आपले नाव हरिश्चंद्र खंडू वरखडे (वय ६४, रा. देऊळअली, जि. सातारा) असल्याचे सांगितले. तो वरील गाडीने जळगाव ते मुंबई असा प्रवास करीत होता.

पंचांसमक्ष तपासणी करीत त्याच्याकडील बॅग उघडली असता त्यात ६१ लाख ३९ हजार रुपये इतकी मोठी रोकड मिळून आली.

शिवाय, आठ तोळे सोनेही त्याच्या बॅगेत मिळून आले. ताब्यातील रक्कम आणि दागिन्यांसह या व्यक्तीला प्राप्तिकर विभाग नाशिकचे उपसंचालक सचिन पुसे यांच्याकडे सुपूर्द केले.

संबंधित प्राप्तिकर अधिकारी त्याला घेऊन नाशिककडे रवाना झाले आहेत. प्राप्तिकर विभाग या प्रकरणाचा आता पुढील तपास करणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक संदीप देसवाल यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790