नाशिक (प्रतिनिधी): येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा उद्योग समूहाचे संचालक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या राहत्या घरापासून अपहरण करण्यात आले होते.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित ॲक्शन मोडवर येऊन तपास कार्याला प्रारंभ केला होता. त्यानंतर आज सकाळी पारख हे आपल्या घरी सुखरूप पोहोचले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे…
तसेच अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार एकूण आठ पथके तयार करण्यात आली असून दोन पथके राज्यबाहेर रवाना करण्यात आल्याची माहिती बच्छाव यांनी दिली.
व्यावसायिक हेमंत मदनलाल पारख (वय ५१, रा. श्रध्दा कॉलनी, नभांगण लॉन्सच्या मागे, इंदिरानगर, नाशिक) यांची त्यांच्या राहत्या घरापासून शनिवारी (दि.२) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर आज (दि.३) रोजी रविवारी पहाटे पारख घरी आले.
असे झाले हेमंत पारख यांचे अपहरण, नंतर सुटका:
हेमंत पारख यांचे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून अपहरण करण्यात आले. चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी हे अपहरण केले. शनिवारी रात्री ९:४० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला. शनिवारी रात्री चार गुंड वाहनातून आले.
त्यानंतर त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत बळजबरीने बसविले. त्यानंतर त्यांनी कार सुसाट वेगाने चालवत पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राहत्या घराच्या येथून पारख यांचे अपहरण झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत तसेच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली. त्याचबरोबर सीसीटीव्हीही तपासण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तसेच प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरासह इंदिरानगर भागात खळबळ उडाली. पारख यांचे अपहरण पूर्व वैमन्यस्यातून झाले का त्यांचे कुणाशी भांडण होते का, कोणी धमकी दिली होती हे पोलिसांनी तपासून पाहिले. पोलिसांना मध्यरात्री पारख यांचे शेवटचे लोकशन अंबेबहुला मिळाले होते. त्यानंतर पोलिसांचा शोध सुरु असतांना पारख यांना सूरत येथे सोडून देण्यात आले.