नाशिक (प्रतिनिधी): रामवाडीतील कोशिरे मळ्यात सापडलेल्या बेवारस व्यक्तीच्या खुनाची अखेर उकल करण्यास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पथकाने अट्टल गुन्हेगारासह एकाला अटक केली आहे.
दरम्यान, शिवीगाळ केल्याच्या क्षुल्लक कारणावरून संशयितांनी लाकडी दांडक्याने मारून त्याचा मृतदेह कोशिरे मळ्यात फेकून दिला होता. गटऱ्या उर्फ सुनील नागू गायकवाड, विकास संतोष गायकवाड, साहिल संजय शिंदे (तिघे रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कॉलेजरोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
३१ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास रामवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोशिरे मळ्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. चौकशीत पंढरीनाथ उर्फ पंड्या रघुनाथ गायकवाड याचा तो मृतदेह असून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आल्याने गंगापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक करीत होते.
अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप यांना संशयित गटऱ्या व त्याचा चुलत भाऊ विकास हे दोघे सिद्धार्थनगर झोपडपट्टीत येणार असल्याची खबर मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी (ता.९) रात्री सापळा रचून दोघांना अटक केली. तर चौकशीत पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी तिसरा संशयित साहिल शिंदे यास अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार रवींद्र आढाव, महेश साळुंके, शरद सोनवणे, मिलिंदसिंग परदेशी, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, समाधान पवार यांनी बजावली.
लाकडी दांडक्याने मारले:
मयत पंढरीनाथ गायकवाड हा मुख्य संशयित गटऱ्याच्या कौलारू घरात असताना त्याने गटऱ्याला शिवीगाळ केली. त्यातून गटऱ्या त्यास लाकडी दांडक्याने बेदम मारून खून केला. त्यानंतर संशयित विकास गायकवाड व साहिल शिंदे यांच्या मदतीने पुरावा नष्ट करीत मृतदेह रिक्षातून रामवाडी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कोशिरे मळ्यात फेकून दिला होता.
गटऱ्याविरोधात २५ गुन्हे:
मुख्य संशयित गटऱ्या याच्याविरोधात शहर-जिल्ह्यात सुमारे २५ गुन्हे दाखल आहेत. यात जबरी चोऱ्या, हाणामाऱ्या, विनयभंग, चोरीचे गुन्हे असून, गंगापूर – १०, दिंडोरी – ४, पंचवटी – ४, भद्रकाली- २, सरकारवाडा – २, उपनगर, सिन्नर व अंबड पोलीस ठाण्यात प्रत्येक एक गुन्हा दाखल आहे.