Breaking: इगतपुरीजवळ तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांचा गुटखा जप्त !
नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी जवळ एका धाब्यावर उभे असलेल्या कंटेनरवर छापा टाकून अन्न औषध प्रशासन विभागाने एक कोटी 96 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
या वर्षातील ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे वाडीवऱ्हे येथे १ कोटी ९६ लाख ८७ हजार किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
यासह ३० लाख रुपये किमतीचे २ कंटेनर सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री संजय राठोड, आयुक्त अभिमन्यू काळे, अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त गणेश परळीकर, सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे, मनिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार, अमित रासकर यांनी केली आहे.
- नाशिक: विमा रक्कमेसाठी दोन हत्या, अनोळखी व्यक्तीला कार खाली चिरडले
- डॉ. प्राची वसंतराव पवार यांच्यावर हल्ला करणारे तिघे जेरबंद.. ‘या’ कारणामुळे केला होता हल्ला…
पथकातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून पाठलाग करीत वाडीवऱ्हे भागातील गुरुनानक ढाबा परिसरात दोन मोठे कंटेनर पकडून झाडाझडती घेतली. त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. यापैकी एका वाहनातून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने त्यांचा १ किलोमीटर पर्यंत पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
वाहन क्र. आर जे 06 जीबी 5203 या कंटेनर मधून एसएसके प्रीमियम या गुटख्याचा एकूण 1 कोटी 50 लाख 54 हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. वाहन क्र. आर. जे. 09 जीबी 0472 या कंटेनरमधून एसएचके प्रीमियम व 4K सरकार ब्रँडचा एकूण 45 लाख 33 हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. दोन्ही कंटेनर मिळून एकूण 1 कोटी 95 लाख 87 हजार किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा व अंदाजे 30 लाख किमतीचे दोन कंटेनर अन्न औषध प्रशासनाने जप्त करून वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी दिले आहेत.
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात कलम 328, 272, 273, 188 व अन्न सुरक्षा मानके कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.